Friday 3 July 2020

दर्शन

                          दर्शन

वळणावळणांनी चढत येणा-या रस्त्याने वाहन घेऊन गावापर्यंत यायचं.तिथून मग अवघड चढणीचा पायी जाण्याचा रस्ता होता. मगच देवीच्या मंदिरात पोचता यायचं.
   दोन दिवसांपूर्वी वरच्या त्या रस्त्यावर दरड कोसळली.खडक-मातीच्या अडथळ्याने रस्ता बंद झाला. बरेच भाविक  मंदिराच्या कळसाला नमस्कार करून गावातूनच परतले होते. ज्यांना दोन तीन दिवस राहणं शक्य होतं  ते गावातल्या धर्मशाळेत  मुक्कामाला राहिले होते.
    धर्मशाळा म्हणजे चार पाच खोल्यांची बैठी इमारत होती. समोर कडुनिंबाच्या सावलीचं अंगण आणि रूंद कठडे असलेला व्हरांडा.
देवीचा नवस फेडायला आपल्या बाळाला घेऊन आलेले निर्मला आणि तिचा नवरा तिथे थांबले होते. निर्मलाचा सगळा दिवस तिच्या बाळाच्या मागे जायचा. व्यवस्थापकांच्या घरून मागून आणलेल्या स्टोव्हवर त्याच्यासाठी मऊ भात करणं , दूध तापवणं . त्याची झबली ,टोपडी ,स्वेटर्स धुवून ती वाळत घालायची आणि वाळेपर्यंत बाहेर थांबून त्यांच्यावर लक्ष ठेवायची. बाळाच्या रडण्याने ती कासावीस व्हायची .बाळाशिवाय तिला बोलायला दुसरा विषय नव्हता.
  तिच्या बाजुच्या खोलीत मावशी आणि काका उतरले होते. काका तसे तब्येतीने ठीक असले, तरी मावशी सतत त्यांच्या तैनातीत असायच्या. वेळच्या वेळी खाणंपिणं, औषधं.
धर्मशाळेपासून जरा दूर एकच एक पत्र्याचं झोपडं होतं.पोरगेलीशी, तरीही एका मुलाची आई असलेली गवराई तिथे राहत होती. नव-याबरोबर मजुरीसाठी जायची. शिवाय दोन्ही वेळा चुलीवर भाक-या भाजणं, भांडी घासणं, सरपण गोळा करणं ... अशी सगळी कामं.
   तिचं लेकरू होतं  तीनेक वर्षांचं.संतोष !शाळिग्रामासारखं काळंसावळं, पण गोमट्या रूपाचं.सकाळी गवराई त्याला न्हाऊ घालून हौसेनं काजळतीट करायची तेव्हा छान दिसायचं ते. पण मग दिवसभरात त्याच्या केसातलं तेल कपाळावर ओघळून यायचं, काजळाचे फराटे गालांवर उठायचे, उन्हातान्हात धुळी-मातीत खेळून ते मळून जायचं.
   मावशी-काका घरी परत न जाता दर्शनासाठी तिथे थांबले, पण इतरांना जशी घरी कळवायची घाई होती, तशी त्यांना नव्हती. गावातल्या एकुलत्या एका टेलिफोन बूथसमोर लोकांनी गर्दी केली त्यात ते नव्हते. घरी वाट बघणारं कोणी नव्हतं.
  दिवसभराचं रिकामपण होतं.ओळख वाढत गेली. निर्मलाची कहाणी तिने सांगितली. लग्नानंतर चौदा वर्षं तिने आई होण्यासाठी वाट पाहिली होती. तो काळ कठीण होता. सुरुवातीला प्रश्नार्थक असलेल्या नजरा नंतर अपमानकारक होत गेल्या.  आणि मग बाळाला त्यांनी घरी आणलं. त्या दोघांनी, त्यांच्या घरच्यांनी, म्हटलं तर इतरांनीही त्यालाआपलं म्हणून स्वीकारलं होतं. तरीही ते खरं त्यांचं नाही , हे कोणाच्या मनातून जात नव्हतं. 'आपलं बाळ ' हे नेहमीसाठी 'आपण दत्तक घेतलेलं बाळ'च राहील की काय असं निर्मलाला वाटत रहायचं.
  बाळाच्या जन्मासाठी बोललेले नवस फेडत ती अनेक देवस्थानांना जात होती. ही देवी त्यातलीच एक.
  आपल्याला दोन मुलं, तीन गोंडस नातवंडं आहेत ,हे सगळं मावशींनी निर्मलाला सांगितलं होतं.फक्त त्या दोन्ही मुलांच्या घरात या दोघा म्हाता-यांसाठी जागा नाही , हे मात्र त्या बोलल्या नव्हत्या.
  दोघा मुलांच्या बुद्धीत आणि नंतर शिक्षणात खूप तफावत होती.त्यातूनच दोघांमधे अंतर पडलं होतं.मोठा आईबापांचा लाडका असं धाकट्याला वाटायचं आणि धाकट्याच्या बाबतीत ते पक्षपात करतात असा मोठ्याने मनाचा पक्का ग्रह करून घेतला होता. दोघांचं कधी पटलं नाही. लग्नांनंतर एकेक करत वाद वाढतच गेले.घरासाठी, इस्टेटीसाठी कोर्टकचे-या झाल्या. आणि अखेर झालं असं की दोघांच्या मनात अन् घरातही आईबापांसाठी जागा राहिली नाही.
   मुलांना वाढवतांना आपलं काय चुकलं हेच  कळलं नाही. थकत चाललेल्या शरीरांनी, दुखावलेल्या मनांनी एकमेकांना सावरत दोघं राहत होते. एखाद्या कथेतल्या पात्रासारखं आपलं आयुष्य आहे, असं मावशींना वाटायचं.
लहानपणी धाकट्याचं एक जीवावरचं आजारपण येऊन गेलं, तेव्हा मावशींनी या देवीला नवस बोलला होता. पण त्याला दर्शनाला घेऊन यायचं राहूनच गेलं होतं. त्याच्याशी बोलणं-चालणं होतं तेव्हा त्याला एकदोनदा म्हटलं होतं, पण नाही जमलं. आता तर काकांनी आणि मुलांनी एकमेकाचं नावच टाकलं होतं.
आता काही दिवसांपूर्वी तो आपल्या बायको-मुलाला घेऊन इथे दर्शनासाठी येऊन गेला असं कळलं . मग मावशींच्या मनात आलं, की जाऊन यावं आपणही. त्याने नीट अभिषेक वगैरे केला असेल की नाही हे एक, आणि शिवाय नवस होता स्वतः मुलाला घेऊन यायचा !
**
              वर मंदिराकडे जाणारा रस्ता अरूंद चढणीचा होता.दगड-माती हलवणारी यंत्रं वर जाऊ शकत नव्हती. मजूर लावून ते काम सुरू होतं. अखेर तिसऱ्या दिवशी रस्ता मोकळा झाला. वर जाणारे लोक दिसायला लागले.
  निर्मला तयार होती.जरीच्या पदरात बाळाला घेतलं होतं. मंदिरात पोचेपर्यंच तीच आता त्याला घेणार होती. नवसच म्हणे तसा होता की मातेनं लेकरू दिल्यावर त्याला ओटीत घेऊन गड चढायचा अन् मातेच्या पायांवर त्याला घालायचं. हिरवी साडी, कपाळावरचा कुंकवाचा टिळा , शेवंतीची वेणी.... देवीचंच हे  रूप दिसल्यासारखं मावशींना वाटलं.
   हे दोघंही आज दर्शनासाठी निघणार होते. मावशी तयार झाल्या. आपल्या खोपटासमोर गवराई न्हाऊनधुवून उभी होती, तिकडे त्यांचं लक्ष गेलं.तिच्या पोटाचा आकार चांगलाच दिसत होता. काही विचाराने मावशींनी तिला हाक दिली.
तिला बसवून त्यांनी कुंकू लावलं. सामानातून एक कोरा ब्लाऊजपीस काढून तिच्या हाती दिला. 'गरवारशीची ओटी नाही भरता येत पण याची चोळी शिवून घे अन् ही एक सुती साडी. उपयोगी पडेल तुला. अन् हे तुझ्या मुलासाठी खाऊला पैसे .'
   गवराईने सगळं घेतलं. स्वतः त्यांच्या पाया पडली अन् संतोषलाही पडायला लावलं. "सुखी रहा रे ,बाबा अन् आईबापांनाही सुखी ठेव " मावशींनी आशीर्वाद दिला.
" बाळंतपण कुठे करणार गं? "
"मायकडेच जाईल . पयलं बाळातपण म्हायेरीच व्हतं नं, "
" पहिलं?" मावशींची नजर संतोषकडे वळली.
"तो माझ्या पोटचा न्हवं, आई ! त्येची आई बाळातपणातच गेली बघा. मीच मोठा केला त्याला."
"अगंबाई, दुसरेपणाची की काय तू?"
"न्हाय बाई, मीच पहिली लग्नाची . पण मला टाकून तिला ठेवली . अशीच बिनलग्नाची . मला नांदवत न्हवते. पण असं बारकं लेकरू सोडून ती गेली तवा आला मला न्ह्यायला "
"आणि तू आलीस ?"
"याच्यासाठी आले ,आई. कोण सांभाळणार व्हतं हितं? मरून ग्येलं असतं लेकरू आयच्या माघारी "
मावशी ऐकत होत्या. "अन् माह्या न्हव-याचाच नं तो, आई. माझाच बघा आता. दोन-चार म्हैन्याचा व्हता तवापून मीच केलं बघा त्याचं"
  आपलं आयुष्य एखाद्या कहाणीसारखं आहे, असं मावशींना नेहमी वाटायचं, पण निर्मला भेटली, गवराईचव्ही गोष्ट ऐकली , तसं प्रत्येकीचीच एक लहान- मोठी कहाणी असते की काय असं त्यांना आता वाटायला लागलं होतं.आई होणं सोपं नाही.
     रस्त्यात थांबत, उठत-बसत मावशी आणि काका वर मंदिरात पोचले. दोघांचीही चांगलीच दमछाक झाली  होती.                     
   देवीमातेसमोर डोकं टेकून मावशींनी मुलांसाठी दीर्घायुष्य मागितलं. नातवंडांचीही आठवण काढली. " सर्वांना सुखी ठेवण्याचं मागणं मागता-मागता कित्येक दिवसांत न भेटलेल्या आपल्या लेकरांसाठी त्यांचा जीव गलबलून गेला.
दर्शन, अभिषेक असे सगळे सोपस्कार आटोपून दोघं गाभा-यात बसले होते. मुलांचं बालपण मावशींच्या डोळ्यांसमोर तरळत होतं. सुखाचे , एकोप्याचे दिवस ! मुलांचं आगेमागे फिरत राहणं, कशाकशाचे हट्ट करणं , त्यांच्या शाळा, अभ्यास, सहली , झोपतांना आईजवळच्या जागेसाठी केलेली भांडणं ...! पुढे दोघं मोठी झाली अन् सारंच चुकत गेलं.
**
   देवीची मूर्ती शस्त्रधारी आणि युद्धाच्या आवेशातली होती.पण मुखवटा मात्र सौम्य, प्रेमळ होता. नजरेतून भक्तांवर माया पाझरत असल्यासारखी होती. जगन्माता होती ती ! सा-या जगाची आई ! आई झालेल्या निर्मलाची एक कहाणी, तर गवराईची दुसरी. आपली आणखी एक. या माऊलीची तर किती लेकरं. कोणी इथवर येऊन भक्तिभावाने  माथा टेकणारे, कोणी हौसेखातर येणारे, कोणी दुसरं कोणी आणलं म्हणून आलेले  ! काही  हिला विसरलेले, काही कायम पाठ फिरवलेले ! काही तर तिच्या देवत्वावर , मायपणावर विश्वासच नसलेले !
   गडावरच्या उंच मंदिरात अनादी काळापासून आपली शस्त्रं -अस्त्रं, शालू- शेले , दागदागिने घेऊन , गजरे-वेण्यांच्या न् धूपदीपांच्या दरवळात , स्तोत्र-आरत्यांच्या गजरात उभ्या असलेल्या देवीला मावशींनी पुन्हा  मनापासून हात जोडले.

सुरेखा काळवीट अग्निहोत्री.





  

Monday 29 June 2020


                         
उंबरठ्यावर चिमणे पाऊल
पंखाची ही पहिली फडफड
उडून जाइल हेच पाखरू
उद्या कधीतरी फांदी सोडून
                       ज्युनिअर आणि सिनिअर केजी
करता-करता दरेक साली
निबंध-कविता ट्युशन-गोष्टी
हातांमधुनी गळेल रेती
काही तासांसाठी म्हणता
लंघून जाशील समुद्र सारे
आणि कोठल्या नव्या अंगणी
सजवशील तू अपुले घरटे
घरी दुपारी तुझी माउली
एकटीच मग राहील पाठी
मुक्या बाहुल्या सोफ़्यावरच्या
आठवणींची गातील गाणी
सुरेखा काळवीट

kavita 2

शुभचिन्हे
गगनाचे गर्द किनारे
मेघांनी दाटून सारे
झाकोळून येती भवती
स्मरणांचे तुझ्या पसारे

स्मरणांचे तुझ्या पसारे ,
 शुभचिन्हे शब्द सुरांची
गीतांच्या  हलक्या ओळी
ती मंद झुळुक वा-याची

शुभचिन्हे शब्द सुरांची
अन् दीप उजळत्या ज्योती
मन सांजावत जातांना
घन उतरून येती भवती


  1. सुरेखा काळवीट

Sunday 28 June 2020

किती वेचले होतेस क्षणांचे मोती पदर भरून
आणि काही गोष्टी मनावर घेतल्या असशील कोरून....
बालपण जपलेले मनात - स्वतःचे, मग मुलाबाळांचे
जावळांचे गंध , स्पर्श अंगड्या-टोपड्यांचे
नंतर त्यांची वाट बघणं दारा-अंगणात उभं राहून......

कोणकोण भेटले वाटेत दूरचे-जवळचे
त्यांच्यासाठी झिजलीस, हासलीस, रडलीस
कधी कुणासाठी जीव आलाही असेल पिळवटून.....
सुख ओथंबून होते घरावर
आणि दुःखांच्या छाया येत्या-जात्या
सांजेच्या निरांजनात रोज काय काय आले असेल दाटून.....
स्तोत्रांच्या त्या लयदार ओळी,
पुस्तकांतले आवडीचे उतारे
लहानपणी भेंड्यांसाठी पाठ केलेली कवितांची कडवी
सारे हाताला येईलसे मनात ठेवले होतेस मांडून......
ओटीतले सारेच कसे सांडून आलीस वाटेत
चेह-यावरचं हासू, ओठांवरचे शब्द
आणि काळजातली मायादेखील
पुढे कोणी भेटणार असेल.......
पुढे.... पुढच्या जन्मी..
एखादी खुणेची अंगठी, एखादा तरी परवलीचा शब्द
आत ठेवला आहेस ना जपून ??

kavita 1











                मुक्ती

किती भिरभिर होती माझ्या सुखदुःखांची

अन् किती नात्यांचे  आवळलेले पाश

किती पायी बेड्या गतकाळाच्या होत्या

अन् पाठीवरती ओझे आठवणींचे

मी गुंतुन असता माझ्या माझ्याभवती

मज अवचित दिसली कितीतरी आयुष्ये

या कालौघाच्या अखंड काठावरती

ही गगनाला टेकत जाती शिखरे

अन् खोल तळाशी द-या किती भयकारी

या अगाध जगती जीव रजःकण माझा

अन् सारी नाती तकलादू धाग्यांची

मज झाले असले विराट दर्शन सखये

त्या पैलतीरीची ऐकू आली हाक

अन् क्षणार्धात मग तुटून पडले बंध
                                                                                                                                                                                                         
                                                        मी माझी उरले एकटीच विश्वात