किती वेचले होतेस क्षणांचे मोती पदर भरून
आणि काही गोष्टी मनावर घेतल्या असशील कोरून....
बालपण जपलेले मनात - स्वतःचे, मग मुलाबाळांचे
जावळांचे गंध , स्पर्श अंगड्या-टोपड्यांचे
नंतर त्यांची वाट बघणं दारा-अंगणात उभं राहून......
कोणकोण भेटले वाटेत दूरचे-जवळचे
त्यांच्यासाठी झिजलीस, हासलीस, रडलीस
कधी कुणासाठी जीव आलाही असेल पिळवटून.....
सुख ओथंबून होते घरावर
आणि दुःखांच्या छाया येत्या-जात्या
सांजेच्या निरांजनात रोज काय काय आले असेल दाटून.....
स्तोत्रांच्या त्या लयदार ओळी,
पुस्तकांतले आवडीचे उतारे
लहानपणी भेंड्यांसाठी पाठ केलेली कवितांची कडवी
सारे हाताला येईलसे मनात ठेवले होतेस मांडून......
ओटीतले सारेच कसे सांडून आलीस वाटेत
चेह-यावरचं हासू, ओठांवरचे शब्द
आणि काळजातली मायादेखील
पुढे कोणी भेटणार असेल.......
पुढे.... पुढच्या जन्मी..
एखादी खुणेची अंगठी, एखादा तरी परवलीचा शब्द
आत ठेवला आहेस ना जपून ??